गुरुवार दिनांक १० जुलै २०२५
गुरुपौर्णिमा 2025
दरवर्षी चेंबूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो . दरवर्षी कार्यक्रमांमध्ये वैविध्य असते.चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.
दरवर्षी या कार्यक्रमात आधीच्या शैक्षणिक वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो.
यावर्षी निवृत्त कर्मचाऱ्यांसोबतच संस्थेच्या सर्व घटक शाखांच्या म्हणजेच प्राथमिक, माध्यमिक, रात्र शाळा, डी.एड .कॉलेज ,बी.एड .कॉलेज या सर्व घटकांच्या मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले गेले.
▪️यावर्षी या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री नरेंद्र पाठक यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.
डॉक्टर पाठक यांचे ३५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे .तसेच संशोधक आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून २०१६मध्ये भारत सरकार तर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालाआहे. याशिवाय आपल्याच चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या बी . एड कॉलेज मधून त्यांनी बी.एड ही पदवी प्राप्त केली . असे प्रा . श्री नरेंद्र पाठक (M.com Bed Ph.D ) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते .
▪️कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले .त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुधीर आपटे यांनी केले .
▪️संस्थेतर्फे १९६४ मध्ये उपासना मासिक सुरु झाले होते .परंतू कालांतराने ते बंद पडले होते . संस्थेचे नियामक सदस्य श्री जयंत जोशी सर यांच्या पुढाकाराने ते पुन्हा सुरू करण्याचे ठरले .त्यासाठी संस्थेच्या विविध घटकांचे प्रमुख तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्यातून डीजीटल स्वरूपात उपासना मासिक तयार झाले व त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या मासिकाचा हेतू तसेच त्याचे उद्दिष्टे काय आहे याबद्दलची माहिती श्री जोशी सर यांनी दिली .
▪️ नियामक सदस्य श्री जयंत जोशी सर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व त्यांचा सत्कार करण्यात आला.
▪️ संस्थेच्या घटक प्रमुखांचा तसेच सन २०२४ / २५ या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेतरांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यामार्फत करण्यात आला .
▪️ प्रमुख पाहुणे डॉ.श्री नरेंद्र पाठक यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत शिक्षकांसमोर व्यक्त केले .
गुरू म्हणजे काय?
विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते कसे असावे ?
आज ते कसे आहे ?
शिक्षकाची भूमिका कशी असावी?
समाजात शिक्षकाचे स्थान काय आहे?
या संदर्भात त्यांनी विविध उदाहरणे दिली .तसेच स्वतःचेही काही अनुभव सांगितले .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( N E P ) व त्याची अंमलबजावणी या सर्व संदर्भातही त्यांनी आपले विचार मांडले .
तसेच त्या संदर्भात शिक्षकांशी संवाद साधला बीएड कॉलेजचे प्राचार्य श्री .चक्रदेव सर यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल आपले मत व्यक्त केले व त्यावर काय उपाययोजना करावी या बद्दल काही प्रश्न प्रमुख पाहुण्यांना विचारले. त्यावर प्रमुख पाहुण्यांनीही समर्पक असे उत्तर दिले .
इतर शिक्षकांनीही काही प्रश्न विचारून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आपले मत व्यक्त केले.
तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते प्राथमिक व माध्यमिक स्तरावर कसे असते या संदर्भात आपली बाजू प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री .विठ्ठल कांबळे सर यांनी भक्कमपणे मांडली .
▪️शेवटी संस्थेचे नियामक सदस्य श्री विष्णू छत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .
▪️शेवटी उपस्थितांना संस्थेकडून सुग्रास असे भोजन देण्यात आले .
▪️या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय समिती अध्यक्षा आदरणीय श्रीम. भूषणा पाठारे मॅडम यांनी केले .