शाळा हीच आमची पंढरी

🚩शाळा हीच आमची पंढरी !🚩
🙏त्यात बागडे आमचा विठूराया !!🙏
~~
आषाढी एकदशीनिमित्त चेंबूर हायस्कूल येथे वारीचे आयोजन करण्यात आले होते.

या वारीमध्ये दिंड्या,पताका,तुळस घेऊन छोटे वारकरी अभंग, कीर्तन, नृत्य, लेझिम यासह सामील झाले होते.
विठ्ठल रखुमाई वेषातील विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. हरीनामाचा टिळा मान्यवर अतिथींना लावण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अभंग सादर केले. संतांच्या शिकवण देणाऱ्या बोधकथा, आषाढी एकादशी ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यानंतर पावसाची संततधार असतानादेखील छोट्या वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली.
यामध्ये विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांची उत्साहाने टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
वारीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या.
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा… या नामदेवांची रचना असलेल्या गीताने प्रारंभ झालेला विद्यार्थ्यांचा मेळा,किर्तनात तल्लीन होऊन नाचला आणि येई हो विठ्ठले … या आरतीने वारीची सांगता झाली.

शालेय समिती अध्यक्षा श्रीम.पाठारे, कोषाध्यक्ष श्री. कागिनकर, चेंबूर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीम चव्हाण, उपमुख्याध्यापक सुभाष माने, पर्यवेक्षक सागवेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वारीत सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवकसभा निमंत्रक अनिता लुगडे व कैलास सानप यांनी केले.